नवी मुंबई : शहरात हुक्का पार्लरवर बंदी असतानाही काही रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये बिनधास्तपणे हुक्का सेवा सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाशी परिसरातील ग्रीनस्केप इमारतीतील प्रसिद्ध हाऊस ऑफ लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री छापा टाकत कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बेकायदेशीररित्या हुक्का पुरविला जात होता. त्यानुसार ८ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या वेळी काही ग्राहक निकोटीनयुक्त व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुगंधी तंबाखू, हुक्क्याचे फ्लेवर्स, सिल्वर फॉईल लावलेले हुक्का पॉट आणि नळ्या जप्त केल्या. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नवी मुंबईत हुक्का पार्लरवर बंदी असतानाही अनेक रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये लपूनछपून हुक्का सेवा दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पोलिसांनी अधूनमधून छापे टाकले तरीही काही ठिकाणी हा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याने प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरातील युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







