राजमाता जिजाऊ रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल; डॉक्टर निलंबित
नवी मुंबई | प्रतिनिधी
ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू असताना गर्भवती सोनम डोंगरे यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची नवी मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी उपचारादरम्यान कर्तव्यात कसूर झाल्याचा संशय व्यक्त करत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या आदेशानुसार, डॉ. भावना पगारे (सर्जन) यांना चौकशी समितीचा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आदेशात नमूद केल्याप्रमाणे, या घटनेमुळे विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या असून महानगरपालिकेच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
मात्र, या आदेशात डॉक्टर दोषी ठरल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. ही कारवाई प्रथमदर्शनी आढळलेल्या बाबी आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेली प्रशासकीय कारवाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अंतिम निर्णय चौकशी समितीच्या अहवालानंतर होणार असून, दोष निश्चित झाल्यास नियमानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने अशा घटनांमध्ये पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







