लॉजवर छापा; महिलेची सुटका, दोघांना अटक
नवी मुंबई : तुर्भे पोलीस ठाण्याच्या पथकाने महापे येथील इलेक्ट्रॉनिक झोन परिसरातील एका लॉजवर छापा टाकून देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन जणांना अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महापे येथील शुभम पार्क रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तुर्भे पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ मार्च रोजी सापळा रचून लॉजवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. तसेच लॉजमधील कॅशियर विजेंद्र पुजारी (४०) आणि वेटर कमरुद्दीन अन्सारी (४९) यांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान या देहविक्रीच्या रॅकेटमध्ये हॉटेलचा मालक गोविंद आर. पुजारी आणि मनोज पुजारी यांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे १५,७२० रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल फोन तसेच इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







